तिरुवनंतपुरम - केरळमधील कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईमधील प्रवाशांना घेऊन येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचा गेल्या शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात मदतकार्यासाठी पीपीई कीटसह इतर सुविधा नसताना 135 स्थानिक आणि 42 पोलिसांनी सहभाग घेत बचावकार्य केले. ह्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
एअर इंडियाचे विमान दुबईहून 190 जणांसह कोझिकोडला पोहोचले होते. विमानतळावर लँडिंगदरम्यान ते 35 फूट खोल दरीत पडले आणि त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला, तर 100 जण जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यातील एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बचावकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांना आणि पोलिसांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, विमान अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्यात भाग घेतल्याने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांचे कौतुक केले.