चंडीगड- हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी काल (मंगळवारी) राज्यभरामध्ये मतदान पार पडले. मतदान शांततेत पार पडल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या होत्या. त्यामुळे ५ मतदान केंद्रावर आज (बुधवार) पुन्हा मतदान घेण्यात येत आहे. सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
पृथला विधानसभा मतदारसंघातील छायसा गावामध्ये पुन्हा मतदान
फरिदाबाद जिल्ह्यातील छायसा गावातील बूथ क्रमांक ११३ वर पुन्हा मतदान घेण्यात येत आहे. मतदान करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे तक्रार गेली होती. या बूथवर एका महिलेसोबत २ व्यक्तीही मतदान करण्यासाठी गेले असता त्यांनी मतदान करतानाचे चित्रण केले होते.
रेवाडी येथील कोसली मतदार संघात पुन्हा मतदान
कोसली मतदार संघातील छव्वा येथील मतदान केंद्रातील बूध क्रमांक १८ वर पुन्हा मतदान होत आहे. काल मतदान करताना गोंधळ झाल्याने जिल्हा निवडणूक अधिकारी यशेंद्र सिंह पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला.
जींद जिल्ह्यातील उचान मतदार संघात पुन्हा मतदान
जींद जिल्ह्यातील उचाना विधानसभा मतदार संघातील करसिंधू येथील बूथ क्रमांक ७१ आणि २३ वर पुन्हा मतदान होत आहे. याबरोबरच झज्जर मतदार संघातील बूध क्रमांक १६१ आणि महेंद्रगड मतदारसंघातील नारनौल येथे पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. काल मतदान करताना गडबड गोंधळ झाल्याने पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जेजेपी पक्षाचे जींद मतदारसंघाचे उमेदवार दुष्यंत चौटाला यांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला होता.