नवी दिल्ली - भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने भारतीय उद्योजक रतन टाटा यांना गौरविण्यात यावे, अशी मोहिम सोशल मिडियावर सुरू आहे. यावर रतन टाटा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चाहत्यांना ही मोहिम थांबवण्याचे आवाहन केले. यासंदर्भात त्यांनी टि्वट केले आहे.
मला भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा, यासाठी सोशल मिडियावरील काही जणांकडून मोहिम राबवण्यात येत आहे. त्यांच्या भावनांचा मला आदर आहे. मात्र, ही मोहिम थांबवावी. मी स्वत: ला भाग्यवान समजतो की मी भारतीय आहे. तसेच भारताच्या प्रगती आणि समृद्धीसाठी प्रयत्नशील आहे, असे टि्वट त्यांनी केले आहे. 'भारतरत्न'साठी सुरू असलेली मोहिम थांबवण्याचं आवाहन करुन असंख्य लोकांचं मन टाटांनी पुन्हा एकदा जिंकलं आहे.
मोटिवेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारत रत्न देण्याची मागणी केली होती. यानंतर बघता-बघता अनेकांनी टि्वट करत या मागणीला समर्थन दिलं. Ratan Tata आणि BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड सुरु झाला.
रतन टाटा 83 वर्षांचे असून त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासाठी मोठ्या प्रमाणात दान केले आहे. कोरोना साथीच्या काळातही त्यांनी देशाला 1500 कोटींची मोठी रक्कम दिली. रतन टाटा हे सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. टि्वटरवर त्यांचे 93 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. टि्वटरवर त्यांनी आपल्या जीवनाशी संबंधित अनेक अनुभव शेअर केले आहेत. ट्विटरशिवाय इंस्टाग्रामवरही त्यांचे 3.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.