नवी दिल्ली - देशात सुरू असलेल्या अनागोंदीला भाजपच जबाबदार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. नव्याने पारित झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. त्याबाबत बोलताना वरिष्ठ काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
देशात सध्या असलेली परिस्थिती दुर्देवी आहे. या सर्व प्रकाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच देशात अशांतता माजली आहे, अशी टीका अल्वी यांनी केली. दिल्लीमधील आंदोलनाच्या वेळी, पोलिसांनी अमित शाह यांच्या आदेशावरूनच विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये घुसून मारहाण केली. त्यांच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी विद्यापीठामध्ये गेला नसता, असा आरोपही त्यांनी केला.
पोलीस स्वतःच गाड्यांची तोडफोड करताना दिसून येत होते, तसेच त्यांनीच बसेसना आग लावली, असा आरोप त्यांनी पोलिसांवर केला. यासोबतच, आंदोलक विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी आणि पांगवण्यासाठी पोलिसांनी मारहाण करण्याची काय गरज होती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
सध्याचे सरकार हे देशाचे नाव खराब करत आहे, अशी टीका करत जपानच्या पंतप्रधानांनी भारत दौरा अचानक का रद्द केला? असा खोचक प्रश्नही त्यांनी सरकारला उद्देशून विचारला.
हेही वाचा : आमचे आंदोलन राष्ट्रविरोधी नाही, जामियातील विद्यार्थ्यांची भूमिका