नवी दिल्ली - देशामध्ये बेरोजगारी एवढी वाढली आहे की, देशातील तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक दिवस लाठ्यांनी मारतील, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी प्रचार सभेत बोलताना केले होते. आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला. 'जर तुम्ही मोदींना मारणार असाल, तर आम्ही तुम्हाला अंडे फेकून मारू' असे रामदास आठवले म्हणाले.
राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींना दांड्यांनी मारणार असतील. तर आम्ही राहुल गांधींना अंडी मारू. नेहमी वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे राहुल गांधी अमेठीमधील निवडणूक हरले आहेत. त्यांनी काँग्रेसची अवस्था खिळखिळी करून ठेवली असून पक्ष संपवत आहेत, असे रामदास आठवले म्हणाले.
राहुल गांधीनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यानंतर नविन वाद निर्माण झाला आहे. त्या वक्तव्यावरून शुक्रवारी लोकसभेत गदारोळ झाला. भाजप आणि काँग्रेस सदस्यांमधील वाद एवढा वाढला की, प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत आले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले होते.
काय प्रकरण?
राहुल गांधी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत मोदींवर टीका केली होती. तरुण-तरुणी सहा महिन्यात त्यांना काठ्यांनी मारतील, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली. 'एक काँग्रेस नेता म्हणला की, मोदींनी 6 महिन्यांत तरुण-तरुणी काठ्यांनी मारतील. जर असे असले, तर मी सहा महिन्यात जादा सूर्यनमस्कार करून स्वतःला दंडाप्रुफ करून घेईन', असे राहुल गांधींचे नाव न घेता मोदी म्हणाले. त्यावर सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला होता. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.