नवी दिल्ली - येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या अयोध्येत सुरु आहे. मंगलकार्य किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याप्रमाणे अयोध्येत आज सकाळी गौरी गणपती पूजनास सुरवात करण्यात आली. या पूजेला मर्यादित पुजाऱ्यांचा समावेश आहे.
बुधवारी पंतप्रधान मोदी प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिराचं भूमिपूजन करणार आहे. मंदिराच्या भूमिपूजनाचा तीन दिवस विधी चालणार आहे. त्यास आज गौरी गणपतीची पूजा करून सुरवात करण्यात आली. तर उद्या म्हणजे, मंगळवारी रामाचे पूजन होईल.
यापेक्षा आणखी कोणता शुभ प्रसंग असू शकत नाही. भगवान गणेशाच्या आशीर्वादामुळे आता मंदिर कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल, असे संत समितीचे महाराज कन्हैय्या दास म्हणाले.
दरम्यान, 22 किलो 600 ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून राम मंदिराचा पाया रचला जाणार आहे. या विटेवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही लिहिण्यात आला आहे. तसेच विटेवर जय श्रीराम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावही लिहिण्यात आलं आहे.