लखनौ - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यांची भेट घेतली. चौथ्या टप्प्यापूर्वी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वातावरणात खळबळ उडण्याची शक्यता आहे. तर, उत्तर प्रदेशात सपा आणि बसपला यामुळे मोठा धक्काही बसण्याचे चित्र आहे. यापूर्वी लोकसभेमध्ये बोलताना मुलायम यांनी मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचे वक्तव्य करून राजकीय पटलावर खळबळ उडवली होती.
समाजवादी पक्षाचे महत्वाचे नेते मानल्या जाणाऱ्या मुलायम सिंह यादव यांची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भेट घेतली. शुक्रवारी त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राजनाथ सिंह आले, अशी चर्चा आहे. मात्र, दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्यापही समोर आलेले नाही.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी केली आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रीय लोक दल हा स्थानिक पक्षही आहे. ही आघाडी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पक्षाच्या बड्या नेत्यांनी घोषणा केली होती. त्यानंतर १६व्या लोकसभेच्या शेवटच्या दिवसांमध्ये संसदेत भाषण करताना मोदीच पंतप्रधान होतील, असे भाकित मुलायम सिंहानी केले होते. त्यामुळे पक्षासोबतच देशामध्ये खळबळ उडाली होती.
त्यानंतर आता राजनाथ सिंहाच्या भेटीमुळे आघाडीला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता आहे. असे असले तरी भेटीनंतर लगेच मुलायम सिंह यांनी आघाडीला उत्तरप्रदेशात बहुमत मिळणार, असे वक्तव्य करून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त म्हणजेच ८० जागा आहेत. त्यामुळे या राज्यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.