नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी अमेरिकेचे संरक्षण सचिव आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री यांच्याशी फोनवर चर्चा केली. अमेरिकेचे संरक्षण सचिव मार्क एस्पर यांच्यासोबत राजनाथ सिंहांनी भारत-चीन सीमाप्रश्नाबाबत चर्चा केली. तर, दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री जेओंग क्येओंग-डू यांच्यासोबत एकत्रितपणे लष्करी साहित्याची निर्मिती करण्याबाबत चर्चा पार पडली.
एस्पर यांच्यासोबत बोलताना दोन्ही देशांकडून सुरक्षेच्या बाबतीत सहकार्य करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. एस्पर यांच्या विनंतीवरुनच ही चर्चा पार पडल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. याआधीही भारत-चीन सीमाप्रश्नावर दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये चर्चा पार पडल्या आहेत. आजच्या संभाषणामध्येही याबाबतच पुढे बोलणी झाल्याचे सांगण्यात आले.
तर, जेओंग यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी एकत्रितपणे लष्करी साहित्याची निर्मिती करण्याबाबत बोलणी झाली. गेल्या काही वर्षांपासून दक्षिण कोरिया हा भारताला शस्त्रास्त्रे आणि लष्करी साहित्य पुरवत आहे. गेल्यावर्षीच दोन्ही देशांमध्ये लष्कर आणि नौसेनेसाठी तयार करण्यात येणाऱ्या नव्या साहित्यासाठी करार झाला होता. याबाबतचा आढावा आजच्या चर्चेत घेतला गेला, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. भारत-चीन सीमाप्रश्नासंबंधी दोन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा झाली की नाही याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
यासोबतच, दोन्ही देशांमध्ये कोरोना महामारी आणि त्याला आळा घालण्यासाठी होत असलेले प्रयत्न याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मंत्रालयाने दिली.
हेही वाचा : पंतप्रधान मोदी आणि मॉरिसन चर्चेनं भारत ऑस्ट्रेलिया संबंधात सुधारणा - भारतीय उच्चायुक्त