नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने छाननी (स्क्रीनिंग) समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी माजी खासदार आणि महाराष्ट्रातील युवा नेते राजीव सातव यांची निवड करण्यात आली आहे. आत्ताच झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. आता त्यानंतर काँग्रेसने दिल्ली काबीज करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
येणाऱ्या १५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा कालावधी संपत आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिकीट वाटपाची सर्व जबाबदारी राजीव सातव यांच्याकडे सोपवली आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी निवडणूक होत आहे. गेल्या निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसने जोर लावला आहे. या निवडणुकीत काँग्रेस किती जागा मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या.
कोण आहेत राजीव सातव
१) राजीव सातव हे काँग्रेसचे प्रमुख नेते
२) राजीव सातव सध्या गुजरातचे प्रभारी म्हणून काम करतायेत
३) काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीत त्यांची महत्त्वाची भूमिका
४) २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवता पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्णय
५) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय
६) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राजीव सातव यांचा विजय