नवी दिल्ली - राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली आरोपी नलिनी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आली आहे. मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी नलिनीने ६ महिन्यांच्या सुट्टीसाठी अर्ज केला होता. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने नलिनीला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे.
मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी तिने पॅरोलचा अर्ज केला होता. ५ जुलैला याबाबत न्यायालयाने मागणी मान्य केली होती. मात्र, ६ महिन्यांऐवजी ३० दिवसांची सुट्टी मंजूर केली. कोणत्याही आरोपीला २ वर्षांतून एकदा पॅरोल मंजूर केला जातो. मात्र, मला २७ वर्षाच्या तुरुंगवासात एकदाही सुट्टी मिळाली नाही, असे नलिनीने अर्जात म्हटले होते.
यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने आरोपींची पॅरोलची मागणी नाकारली होती. तसेच राजीव गांधी हत्येप्रकरणातील दोषींना सोडण्याची मागणी करणारी याचिकाही न्यायालयात केली होती. पंरतु, न्यायालयाने ती नाकारली होती.
१९९१ साली निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधीची हत्या करण्यात आली होती. आत्मघाती हल्लेखोराने राजीव गांधीना भेटण्याच्या बहाण्याने जवळ येत स्फोट घडवून दिले होते. यामध्ये राजीव गांधीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ७ दोषींना अटक करण्यात आली होती. पेरारीवलन, मुरुगन, नलिनी, शांतन, रविचंद्रन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस या कटात सहभागी असल्याने तुरुंगात आहेत.