चेन्नई - मक्कल नीधी मय्यम (एमएनएम) या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि अभिनेते कमल हसन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांची पाठराखण केली आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांबाबत रजनीकांत यांनी केलेले वक्तव्य ही टीका नसून सत्यपरिस्थिती आहे, असे वक्तव्य कमल हसन यांनी केले.
हसन पुढे म्हणाले, की तामिळनाडूच्या हितासाठी आपण रजनीकांतसोबत आहोत. मात्र, हे राजकीयदृष्ट्या एकत्र येणे आहे की नाही याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही.
तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळेल असे पलानिस्वामींना स्वप्नातदेखील वाटले नसेल, त्यांची झालेली प्रगती हे एक आश्चर्य आहे; असे रजनीकांत यांनी म्हटले होते. यावर अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता. याबाबत कमल हसन यांना त्यांचे मत विचारले असता, ही सत्यपरिस्थिती आहे, असे म्हणत त्यांनी रजनीकांतची पाठराखण केली.
रजनीकांत यांनी आधीच आपण राजकीय पक्ष स्थापन करणार असून, पुढील विधानसभा निवडणूका लढवण्याचे संकेत दिले आहेत. तर, कमल हसन यांचा एमएनएम हा राजकीय पक्ष आधीच स्थापन झाला आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या हितासाठी हे दोघे एकत्र येणार म्हणजे, राजकीय युती करणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे.
याबाबत विचारले असता, आम्ही एकत्र येणे ही काही नवी बाब नाही, आम्ही गेली ४४ वर्षे एकत्रच आहोत, असे म्हणत हसन यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. चित्रपट क्षेत्रात एकत्र असण्याबाबत ते बोलत होते. रजनीकांत यांनी अपूर्व रागंगल (१९७५) या चित्रपटातून तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटात कमल हसन यांनीही भूमीका केली होती.
हेही वाचा : कर्नाटक पोटनिवडणूक : १२८ अपक्षांसह २४८ उमेदवार रिंगणात