जयपूर - सध्या देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सध्या डॉक्टर, नर्स, पोलीस प्रशासन, अन्नपुरवठा कर्मचारी हे अहोरात्र मेहनत घेत आहेत. अशात आता राजस्थान सरकारने आणखी २००० डॉक्टर तसेच ९००० नर्स यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्री रघू शर्मा यांनी बुधवारी ही माहिती दिली.
सध्या विविध जिल्ह्यातील ७३५ नवे डॉक्टर भरती करण्यात आले आहेत. तसेच आणखी २००० डॉक्टरांची नेमणूक प्रक्रिया सुरू आहे. तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सुचनेनुसार, १२५०० नर्सची भरती देखील सुरू झाली आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
राज्यातील आरोग्यासंबधी असलेल्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या दररोज ४७०० कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत. त्या १० हजारापर्यंत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, विविध जिल्हास्तरावर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.