जयपूर - राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना नोटीस पाठवली होती. याविरोधात सचिन पायलट यांच्या गटाने राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर आज न्यायालय निर्णय देणार आहे. अंदाजे साडेदहा वाजता न्यायालय आपला निर्णय जाहीर करणार आहे. न्यायालयाने याआधीच विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांना नोटीसची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले होते.
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इंद्रजीत महंती आणि न्यायाधीश प्रकाश गुप्ता यांच्या खंडपीठाने 21 जुलैला पायलट यांच्या संदर्भातील याचिकेवर खटला चालवला. तेव्हा त्यांनी सीपी जोशी यांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. आज हे खंडपीठ शेवटचा निर्णय जाहीर करणार आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सीपी जोशी यांनी निर्णय मान्य केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि याचिका दाखल केली. जोशी म्हणाले की, मी संविधानानुसारच आमदारांना नोटीस पाठवली होती. मी माझं कर्तव्य नीट पार पाडत आहे. त्यामुळेच मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नियमानुसार आमदारांना नोटीस पाठवायची की नाही त्यासंबंधी कारवाई करण्याचे सर्व अधिकार मला आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत उच्च न्यायालयात जाण्याची गरज नाही. तरीसुद्धा मला उच्च न्यायालयाकडून प्रक्रिया थांबवण्यासाठी सांगितलं गेलं आहे, असे जोशी म्हणाले.