जयपूर : राजस्थानचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. पायलट यांची बंडखोरी, आणि उपमुख्यमंत्री पदावरून त्यांची करण्यात आलेली हकालपट्टी हा चर्चेचा विषय झाला आहे. मात्र, राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आतापर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
गजेंद्र सिंह शेखावत, ओम माथूर आणि गुलाब चंद कटारिया अशा वरिष्ठ भाजप नेत्यांनी याप्रकरणी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, राजे या सध्या 'वेट अँड वॉच' भूमिकेत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
लोकसभा खासदार हनुमान बेनिवाल यांनी वसुंधरा राजे या गहलोत यांची मदत करत असल्याचा दावा केला आहे. या दोघांमध्ये झालेल्या संवादाचा पुरावा देखील आपल्याकडे असल्याचे बेनिवाल यांनी म्हटले आहे. "राजे या गहलोत यांचे अल्पमतातील सरकार वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत." अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच, याबाबत त्यांनी बऱ्याच काँग्रेस आमदारांशी बोलणी केल्याचेही बेनिवाल म्हणाले.
गहलोत आणि राजे हे एकमेकांचे भ्रष्टाचार लपण्यासाठी मदत करत आहेत. राजेंनी त्यामुळेच काँग्रेस आमदारांना पायलट यांच्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे, असा आरोप बेनिवाल यांनी केला आहे.
१८ आमदारांसह बंडखोरी केलेल्या पायलट यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, की ते भाजपमध्ये जाणार नाहीत. एवढ्या आमदारांचा पाठिंबा असला, तरी गहलोत सरकारला यामुळे धोका निर्माण होणार नाही. गहलोत यांनी याआधीच आपल्याला १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र ज्योतिरादित्य सिंधियांनंतर काँग्रेसला आता पायलट यांना गमवायचे नाही. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पायलट यांच्याशी बोलणी करण्याची मागणी केली आहे.