जयपूर - राजस्थानात उद्या(शुक्रवार) विधीमंडळाचे सत्र सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यामध्ये वाद सुरू होता. आज सत्ताधारी काँग्रेस विधिमंडळ नेत्यांची बैठक गेहलोत यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला सचिन पायलटही उपस्थित होते. दरम्यान, उद्या सभागृहात काँग्रेस सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे.
अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रस्तावावर आमदारांच्या सह्याही घेण्यात आल्या आहेत, असे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. काँग्रेस पक्षांतर्गत सुरु असलेला वाद निवळत असल्याचे दिसून येत आहे. सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी सरकार विरोधात बंडाचा झेंडा उभारला होता. मात्र, पक्षनेतृत्वाने लक्ष घातल्याने हा वाद मिटण्याच्या मार्गावर आहे. सचिन पायलट यांनी गेहलोत यांची निवास्थानी भेट घेतली.
कटारिया म्हणाले, 'काँग्रेस दोन घरांमध्ये बसलेली दिसू येत आहे. त्यामुळे राज्यातील विकास कामे अडकली आहेत. अशा स्थितीत भाजप सत्राच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस विरोधात अविश्वास ठराव मांडेल. मात्र, अविश्वास ठराव आणण्यामागे भाजपची काय रणनिती आहे, यावर बोलण्यास कटारिया यांनी बोलणे टाळले.
भाजपकडे ७२ आमदारांचे संख्याबळ आहे. तीन आरएलपी पक्षाच्या आमदारांना मिळून भाजपच्या बाजूने ७५ आमदार आहेत. अशा परिस्थितीत जर भाजप अविश्वास ठराव आणत असेल तर त्यांना अपक्ष आणि बंडखोर आमदारांचा पाठिंबा घ्यावा लागेल. आम्ही प्रस्ताव मांडणार आहोत. जे सरकारच्या विरोधात असतील ते ठरावाच्या बाजूने मतदान करतील, असे कटारिया म्हणाले. दरम्यान, काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.