हैदराबाद : मंगळवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तेलंगणामध्ये तब्बल ३० लोकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. यांपैकी १९ जण हे हैदराबादमधील आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पहायला मिळाला. हैदराबादमध्ये त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.
शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिक अडकून पडले होते. नागरिकांना दिलासा देण्याकरता तेलंगणा सरकारच्या बचाव मोहिमेत एनडीआरएफच्या जवानांनीही सहभाग घेतला होता. सैन्याने बंडलगौडा येथे बचाव मोहीम राबवली. तसेच, विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना सैन्याने सुरक्षित स्थळी हलवले. सैन्याच्या वैद्यकीय पथकाकडून जीवनावश्यक वस्तुंची मदतही अडकून पडलेल्या नागरिकांना देण्यात येत होती.
तर, तेलंगणा सरकारने केलेल्या मदतीसाठी सैन्याचे बचाव पथक कार्यरत होते. या पथकाने २२ जणांना वाचविले, तर १ हजार १६५ जणांना सुरक्षितस्थळी नेले.
हेही वाचा : हैदराबाद शहराला पावसाने झोडपले, पाहा व्हिडिओ
बुधवारी हैदराबादमधील बंडलगुडा भागात भिंत कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले होते. तिघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत ईब्राहीमपट्टणम येथे घराची छत कोसळल्याने 40 वर्षीय महिला आणि तिच्या 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रमाणेच आणखी काही लोकांचा वाहून गेल्याने, तसेच विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : VIDEO : हैदराबाद शहरात मुसळधार पाऊस; पुराच्या पाण्यात गाड्या गेल्या वाहून
दरम्यान, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमधील परिस्थितीकडे गृहमंत्रालयाचे लक्ष आहे, आणि मोदी सरकार लोकांची सर्वेतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी दिली. यासोबतच, पुराचा फटका बसलेल्या लोकांसाठी मी प्रार्थना करत असल्याचेही ते म्हणाले.