नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना संकटाने थैमान घातले असून भारतामध्ये रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने कामगार देशातील विविध भागामध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १ जूनपासून २०० बिगरवातानुकूलित स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केली.
सध्या देशात 200 श्रमिक रेल्वे धावत आहेत. येत्या दिवसांमध्ये हा आकडा वाढून आणखी रेल्वे धावतील. 1 जून पासून दररोज 200 बिगरवातानुकूलित रेल्वे वेळापत्रकाप्रमाणे धावतील. यासाठी रेल्वेचे ऑनलाईन बुकिंगही लवकरच सुरु होईल, असे गोयल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सांगितले.
राज्य प्रशासनाने स्थलांतरित मजुरांना सहकार्य करून, त्यांच्या जवळ असलेल्या मेनलाइन स्टेशनजवळ नोंदणी सुरु करावी. तसेच नोंदणी केल्यानंतर ती यादी रेल्वे अधिकाऱ्यांकडे द्यावी. जेणेकरुन त्यानुसार श्रमिक स्पेशल रेल्वे चालवण्यात येतील, असे आवाहन गोयल यांनी राज्य सरकारांना केले आहे. याचबरोबर स्थलांतरीत मजुरांनी एकाच ठिकाणी राहावे, लवकरच त्यांना घरी पोहचवण्यात येईल, असेही गोयल यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी रेल्वे विभागाने ३० जूनपर्यंतची सर्व प्रवासी तिकिटे रद्द केली होती.