नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर १२ मे पासून सुरू केलेल्या ३० विशेष रेल्वे आणि १ जूनपासून सुरू होणाऱ्या १०० रेल्वेच्या तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल केला आहे. गुरुवारी रेल्वेने या रेल्वेच्या तिकीट बुकिंगसाठीचा रिझर्वेशनचा ३० दिवसांचा अवधी वाढवून १२० दिवस केला आहे. त्यामुळे, आता प्रवाशांना तिकिटांचे रिझर्वेशन करताना जास्त दिवसांचा काळ आणि सुविधा मिळणार आहे.
माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या सर्व विशेष रेल्वेच्या आगाऊ आरक्षण कालावधी ३० दिवसांवरून १२० दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता विशेष रेल्वेचे रिझर्वेशन करताना ग्राहकांना आता १२० दिवसाआधीपासून रिझर्वेशन करता येणार आहे. यासोबतच, सुरू करण्यात येणाऱ्या सर्व २३० विशेष रेल्वेमध्ये पार्सल आणि सामानांची बुकिंग करण्यासही परवानगी देण्यात येणार आहे, असेही रेल्वे मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.
या पत्रकामध्ये दिलेल्या नियमांच्या बदलांची अंमलजावणी ही ३१ मे २०२० ला रात्री ८ वाजतापासून करण्यात येणार आहे. त्यानुसार, विशेष रेल्वेच्या रिझर्वेशनकरता, अधिकारीक वेबसाईट, मोबाईल अॅपसह काही रेल्वे स्थानकांवरील तिकीट काऊंटर, पोस्ट ऑफिस, प्रवासी तिकिट सुविधा केंद्र, अधिकृत एजेंट्स, पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम आणि कॉमन सर्विस सेंटरवरूनही तिकिंटाचे रिझर्वेशन करता येणार आहे. मात्र, याकरता सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच इतर नियम व अटींचे पालन करणे आवश्य असणार आहे.