नवी दिल्ली - कोरोनाग्रस्तांचा देशातील आकडा 1 हजारच्या पुढे गेला आहे. संपूर्ण देशावर कोरोना विषाणूचे संकट आले आहे. अशा कठीण काळात सरकारसोबत असल्याचे राहुल गांधीनी पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे कळवले आहे. आपण मिळून या संकटाचा सामना करू, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
'अचानक लॉकडाऊन केल्यामुळे देशात भीती आणि संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही या संकटकाळात सरकारसोबत आहोत. आपण सर्वजण मिळून कोरोना विरोधात लढू. देशात लॉकडाऊन झाल्यामुळे सरकारने गरीबांकडे लक्ष द्यायला हवे. देशातील गरिबांना त्रास होत असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत', असे ते म्हणाले.
संपूर्ण लॉकडाऊनऐवजी इतर विकसित देशांनी राबवलेल्या उपाययोजना राबविण्याची मागणीही त्यांनी पंतप्रधानांना केली. भारतातील परिस्थिती वेगळी आहे. भारतात दैनंदिन कमाईवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महामारी रोखण्यासाठी संपूर्ण आर्थिक व्यवहार ठप्प करणे योग्य नाही.
लॉकडाऊनमुळे देशातील गरिबांची उपासमार होत असून अनेकांचे रोजगार गेले आहेत. मजूर आणि नोकरदार शहरांमधून आपल्या मूळ गावी परतत आहेत. पुढील काही दिवस त्यांची काळजी घेण्यासाठी गरिबांच्या खात्यात रोख रक्कम टाकण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मोदींकडे केली.