चंदीगढ : काही दिवसांपूर्वी मंजूर झालेल्या कृषी कायद्यांविरोधात संपूर्ण देशातून विरोध होतो आहे. यासाठीच काँग्रेस नेते राहुल गांधी आज पंजाबमध्ये खेती बचाओ यात्रेची सुरुवात करणार आहेत. या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा पंजाबमध्ये सुरू होऊन, दिल्लीमध्ये संपेल. सध्या तीन दिवसांचे कार्यक्रम निश्चित करण्यात आले असून, यामध्ये ट्रॅक्टर रॅलीचाही समावेश आहे.
मोगा जिल्ह्यातील बधनी कलान येथे आज राहुल गांधी या यात्रेची सुरुवात करतील. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन (नि.) अमरिंदर सिंग आणि राज्यातील इतर नेतेही असतील. बधनी कलान ते जाटपूरा यादरम्यान आज ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर जाटपूरामध्ये राहुल गांधी जनतेला संबोधित करतील.
शेतकऱ्यांसाठी जाचक असे हे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आपण आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. २४ सप्टेंबरपासून काँग्रेसने या आंदोलनांना सुरुवात केली असून, १४ नोव्हेंबरपर्यंत ही आंदोलने सुरू असणार आहेत. यादरम्यान काँग्रेस देशभरातील दोन कोटी शेतकऱ्यांच्या या कायद्याविरोधात स्वाक्षऱ्या घेणार आहे. या स्वाक्षऱ्या ते नंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सादर करणार आहेत.
हेही वाचा : पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; यावर्षी तब्बल तीन हजारांहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन