नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राफेल करारावरुन पुन्हा एकदा नवीन गौप्यस्फोट केला आहे. अनिल अंबानींनी राफेल करार होणाच्या १० दिवस अगोदरच फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांना भेटून या करारात माझे नाव असल्याचे सांगितले होते. याचा पुरावा म्हणून त्यांनी पत्रकार परिषदेतच एअरबस नावाच्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या ईमेलची प्रत सर्वांसमोर सादर केली. यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.
राफेल करार होण्याच्या १० दिवस अगोदरच या करारात माझे नाव असल्याचे अनिल अंबानींना कसे कळाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करुन खुद्द मोदींनीच भारतातील सर्वात मोठ्या सुरक्षा कराराची गुप्त माहिती अनिल अंबानींना दिली. देशाची संवेदनशील आणि गुप्त माहिती सुरक्षित ठेवण्याची शपथ पंतप्रधान घेतात. मात्र, राफेलची गुप्त माहिती अनिल अंबानीसारख्या खासगी उद्योजकाला देऊन मोदींनी या शपथेचा भंग केला. त्यामुळे भ्रष्टाचाराबरोबरच देशाच्या सुरक्षेला धोका उत्पन्न केल्याबाबत मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राहुल गांधींनी यावेळी केली.
राफेलवर आलेल्या कॅगच्या अहवालाचाही त्यांनी यावेळी खिल्ली उडवली. 'कॅग म्हणजे कॉम्ट्रोलर अॅन्ड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया नव्हे, तर चौकीदार ऑडिटर जनरल ऑफ इंडिया' बनल्याची टीका त्यांनी केली. आत्तापर्यंत न बनलेलाच कॅगचा अहवाल केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालायाला दिल्याचे ते म्हणाले. ज्या कराराची माहिती देशाचे त्यावेळचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, परराष्ट्र सचिव तसेच एचएएलला सुद्धा नव्हती, त्याची माहिती अनिल अंबानींना मिळालीच कशी? असा खडा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
नरेंद्र मोदी गुप्तहेरांचे काम करत असून देशाची गुप्त माहिती दुसऱ्यांना पुरवत आहेत. या करारासाठी मोदींनी अंबानींचे 'मिडलमॅन' म्हणून काम केले आहे. कॅगचा अहवाल म्हणजे चौकीदाराने स्वत:च्या बचावासाठी बनवलेला अहवाल असून त्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर देखील ताज्या खुलाशाने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. अधिकृत प्रकियेचा भंग, भ्रष्टाचार आणि देशाच्या सुरक्षेशी तडजोड या तिनही प्रकरणात कारवाई होणार असून पंतप्रधान मोदी लवकरच तुरुंगात असतील, अशी भविष्यवाणीही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली.