नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी टि्वट करत इशारा दिला आहे. 'अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून घसरली असून बोगद्याच्या शेवटी कोणताच प्रकाश नाहीये. तुमच्या अकार्यक्षम अर्थमंत्री तुम्हाला प्रकाश असल्याचे सांगत असतील तर मंदीची गाडी जोरात धावत येत आहे, हे लक्षात ठेवा,' असे त्यांनी टि्वट करत म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अर्थव्यवस्थेविषयी एक अहवाल सादर झाला होता. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याच सुधारणा दिसत नसल्याचे त्यामध्ये म्हटले होते. त्यावरून राहुल गांधी यांनी टि्वट करत मोदींनी इशारा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेला दारुण पराभव आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या पारंपरिक अमेठी या मतदारसंघात झालेली हार पाहता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे आता काँग्रेसच्या कार्यकारिणीकडून नव्या अध्यक्षाचा शोध घेतला जात आहे. यासाठी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे काही वरिष्ठ नेत्यांनी सुचवले आहे.