पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. सत्तेत येण्यासाठी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पूर्व चंपारण येथे प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. मोदी आता 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणार नाहीत. कारण, आपण खोटे बोललो होतो, हे ते जाणून आहेत. आता पुन्हा मोदींनी जर दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले. तर लोक त्यांना पळवून लावतील, असे राहुल गांधी प्रचार सभेत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक देशात लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले. स्थलांतरीत कामगारांचे हाल झाले. त्यांनी लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर तीन्ही कृषी कायदे रद्द करू. तसेच बिहारमधून कुपोषण आणि भूकबळी दूर करू. मात्र, भाजपच्या तुलनेत आम्ही एका गोष्टीत कमी आहोत. आम्हाला त्यांच्याइतके खोटे बोलणे जमत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार -
भारतीय जनता पक्षाने काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राहुल यांच्या एका टि्वटचा दाखल देत हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. राहुल यांनी टि्वट करून मत मागण्याचा प्रयत्न केला, असल्याचा आरोप करत भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात -
बिहारमध्ये पहिल्या टप्प्पयातील मतदानाला आजपासून सुरूवात झाली आहे. 16 जिल्ह्यांमधील 71 जागांसाठी ही निवडणूक पार पडेल. यामध्ये 1 हजार 66 उमेदवारांचे नशीब मशीनबंद होणार आहे. तर 14 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानासाठी 31 हजार 371 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.