रांची - सर्व चोरांचे नाव मोदी कसे? नरेंद्र मोदी, नीरव मोदी आणि ललित मोदी हे सर्व मोदी चोर आहेत, असा घणाघाती वार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. शुक्रवारी मुंबई येथून लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज झारखंड येथे दाखल झाले. त्यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला फैलावर घेतले.
लोकसभा निवडणुकांना फारच थोडा कालावधी उरलेला आहे. निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुंकाची तारीख केंव्हा जाहीर करणार, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, काँग्रेस अध्यक्षांनी लोकसभेचे रणशिंग फुंकूनही टाकले आहे. आज ते झारखंडच्या दौऱयावर होते. यावेळी रांचीच्या मोरहाबादी मैदानात एका भव्य जनसभेला त्यांनी संबोधित केले. मोदी जेथे कोठेही जातात तेथे लोकांमध्ये केवळ तिसस्कार पसरवत असतात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मोदी उद्योगांच्या नावावर आदिवाश्यांची घरे हिसकावून घेतात. मोदींनी आत्तापर्यंत किती उद्योग झारखंडमध्ये स्थापित केले? किती लोकांना आत्तापर्यंत त्यांनी रोजगार दिले. मोदी केवळ खोटे बोलतात, असे अनेक आरोप राहुल गांधी यांनी यावेळी मोदींवर लावले. जर अनिल अंबानी आणि १५ उद्योगपतींचे कर्ज माफ होऊ शकतात तर, गरीब शेतकऱ्यांचे कर्ज का माफ होऊ शकत नाहीत, असे सवालही राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केले.
सभा स्थळावर पोहोचल्यानंतर पारंपारिक वस्त्र परिधान केलेल्या काही युवक युवतींनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान त्यांच्यासमोर आदिवासी नृत्य करू लागले. त्यावेळी राहुल गांधी यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही युवकांचे हात पकडून नाचण्यास सुरुवात केली. त्यांचे हे नृत्यू त्यावेळी उपस्थित लोकांच्या कॅमेऱ्यांनी टिपले. तो व्हिडिओ आता समाज माध्यमांवर तुफान गतीने व्हायरल होत आहे.