नवी दिल्ली - पाच मध्यम मल्टी-रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एमएमआरसीए) च्या पहिल्या तुकडीतील राफेल जेट विमाने आज अंबाला एअरबेसवर दाखल झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. त्यांनी “पक्षी भारतीय आकाशात दाखल झाले आहेत… हॅपी लँडिंग इन अंबाला! ” अशा शब्दांत ट्वीटच्या मालिकेने या विमानांचे स्वागत केले आहे.
राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) त्यांना देण्यात आलेल्या या विमानांसाठी अभिनंदन केले. या विमानांमुळे हवाई दलाची क्षमता दिवसेंदिवस वाढत राहील, अशी आपल्याला खात्री असल्याचे ते म्हणाले. तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योग्य निर्णयाबद्दल आभार मानले.
'या विमानाची कामगिरी चांगली आहे. शस्त्रे, रडार आणि इतर सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या जगातील सर्वोत्तम क्षमता याच्यामध्ये आहेत. भारतात त्याचे आगमन देशाला उद्भवणारा कोणताही धोका टाळण्यासाठी आणि हवाई दलाला अधिक मजबूत बनवण्यासाठी ही विमाने उपयुक्त ठरतील,' असे या विमानाच्या क्षमतेविषयी बोलताना सिंह म्हणाले.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या विमानांच्या खरेदी प्रकरणात योग्य निर्णय घेतला. यामुळे राफेल जेट्स फ्रान्सबरोबरच्या आंतर-शासकीय कराराद्वारे विकत घेण्यात आली,' असे ते म्हणाले.
कोविड-19 ची साथ देशभरात आणि जगभरात पसरलेली असतानाही आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी घातलेल्या कठोर निर्बंधांनंतरही विमान आणि त्याची शस्त्रे वेळेवर मिळाल्याबद्दल त्यांनी फ्रान्स सरकार, डॅसॉल्ट एव्हिएशन आणि इतर फ्रेंच कंपन्यांचे आभार मानले.
राजनाथ सिंह यांनी भारतीय अवकाशात दाखल झालेल्या विमानाचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले. या पाच राफेल विमानांनी दोन भारतीय एसयु 30 एमकेआय एअरक्राफ्टच्या संरक्षणात भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. तत्पूर्वी, इंडियन नेव्हल शिप (आयएनएस) कोलकाताच्या कॅप्टनने हिंद महासागरात राफेल विमानांचे स्वागत केले.