चंडीगड - पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात तरणतारण जिल्ह्यात आणखी २३ जणांचा मृत्यू झाल्याने ही संख्या वाढली. या प्रकरणी आत्तापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली आहे.
तरणतारण जिल्ह्याव्यतिरिक्त अमृतसरमध्ये ११ आणि गुरुदासपूरच्या बाटलामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांचे नातेवाईक जबाब नोंदवण्यासाठी पुढे येत नसून अनेकांनी तर शवविच्छेदन करण्यासही नकार दिला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अनेक मृतांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगत आहेत, अशी माहिती गुरुदासपूरचे पोलीस उपायुक्त मोहम्मद इशफाक यांनी दिली.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी पातळीवर चौकशीचे आदेश दिले आहेत.