चंदीगढ - पंजाब पोलिसांनी खलिस्तानी चळवळीशी संबधीत दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. होशियारपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. 'खलिस्तान झिंदाबाद फोर्स' या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मखान सिंग गिल उर्फ अमिल आणि देवेंद्र सिंग उर्फ हॅप्पी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही होशियारपूर जिल्ह्यातील जथ्थर गावातील रहिवासी आहेत. पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली. दोघांकडून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. यात अत्याधुनिक बंदुकांचाही समावेश आहे. यासोबत एक कार, चार मोबाईल, इंटरनेट डोंगल जप्त करण्यात आले आहे.
पंजाबात दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न
राज्यात दहशतवादी हल्ले घडवून शांतता नष्ट करण्याचा काही खलिस्तानी दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आम्हाला गुप्त सुत्रांकडून माहिती मिळाली होती, असे पोलिसांनी सांगितले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पंजाब पोलिसांनी मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. त्याअंतर्गत अनेक ठिकाणांवर छापे मारण्यात येत आहेत. कॅनडामधील खलिस्तानी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या काही व्यक्तींशी संबंध असल्याचे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी सांगितले. या गटांचे पाकिस्तानशीही संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पाकिस्तानशीही लागेबांधे
अटकेतील मखान सिंग गिल हा दहशतवादी अमेरिकेत राहीला असून तो पाकिस्तानात १४ वर्षांसाठी वास्तव्यास होता. तसचे त्याने पाकिस्तानात प्रशिक्षण घेतल्याचेही तपासात समोर आहे आहे. पाकिस्तानशी खलिस्तान जिंदाबाद या संघटनेचे लागेबांधे असल्याचे पोलिसांनी सांगितले. खलिस्तानी चळवळ पंजाब राज्यात सतत डोके वर काढत असते. मागील वर्षी स्वातंत्र्यदिनी पंजाबातील एका सरकारी इमारतीवर खलिस्तानचा झेंडा फडकावण्यात आला होता.