चंदीगढ - पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली परिसरात सीमावादावरून चीनी सैन्यांशी झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. यातील चार जवान पंजाब राज्यातील होते. या जवानांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीसोबत आर्थिक मदत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जाहीर केली आहे. तसेच शहिदांच्या कुटुंबियांना दिलासा देत दु:ख व्यक्त केले आहे.
जवानांनी दिलेले बलिदान कधीही विसरले जाणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले. जवानांच्या कुटुंबियांना झालेल दु:ख कोणत्याही भौतिक गोष्टींनी भरून निघणार नाही, मात्र, आर्थिक मदत आणि नोकरीने त्यांच्या काही अडचणी कमी होतील, असे अमरिंदर सिंग म्हणाले.
जवानांच्या अंत्यविधीला कॅबिनेट दर्जाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जवानांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्यविधिसाठी तत्काळ तयारी करण्याचे आदेश सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
चारही शहीद जवानांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. नायब सुभेदार मनदिप सिंग आणि नायब सुभेदार सतनाम सिंग हे दोन जवान विवाहीत असल्याने सरकारी नियमानुसार प्रत्येकी 12 लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तर इतर दोन अविवाहीत जवान शिपाई गुरुतेज सिंग आणि सिपायी गुरुबिंदर सिंग यांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येणार आहे.