चंदीगड - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंजाब सरकारने १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. पंजाब सरकारमधील सुत्रांनी यासंबंधी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.
येत्या काही आठवड्यामध्ये कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेता कर्फ्यू गरजेचा असल्याचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवांवर ताण येणार असल्याचे ते म्हणाले.
पंजाबमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. एकूण रुग्णसंख्या ३४७ झाली आहे. कम्यूनिटी प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी तेलंगाणा सरकारने ७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. त्यानंतर आता पंजाबने पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ३ मेपर्यंत देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकाराच्या सतत संपर्कात आहेत.
लॉकडाऊन उठविण्यासंबधीचा निर्णय कोरोना प्रसाराचा आढावा घेतल्यानंतर घेण्यात येणार आहे. काही राज्यांनी लॉकडाऊन शिथिल करण्याचाही मागणी केली आहे. कोरोना हॉटस्पॉट शोधून काढल्यानंतर ज्याभागमध्ये प्रसार नाही, तेथे लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी काही राज्य सरकारांनी केली आहे. मात्र, अतिसंवेदनशिल आणि रेड झोनमध्ये लॉकडाऊन तसाच सुरू ठेवण्याची शक्यता आहे. तसेच आंतरराज्य प्रवासास परवानगी मिळण्यावरही प्रश्नचिन्ह उभे आहे.