चंदीगड - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील मंगळवारी सर्व उघड्या बोअरवेल्स बंद करण्याचे निर्देश दिले आहे. संग्रूर गावातील फतेहवीर या २ वर्षीय मुलाचा बोअरवेलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी १०८ तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री सिंग यांनी हा निर्णय घेतला.
फतेहवीर याच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. तसेच, पंजाब सरकार आणि मुख्यमंत्री सिंग यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. तसेच, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणे टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री सिंग स्वतः या बचावकार्यवर लक्ष ठेवून होते. आपत्ती संरक्षक दलांना बचाव कार्यात आलेल्या अडथळ्यांविषयीही अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. ६ जून रोजी फतेहवीर हा मुलगा खेळता-खेळता १५० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. या मुलाला बाहेर काढण्यासाठी समांतर खड्डा खोदण्यात आला होता. १०८ तासांनंतर त्याला बाहेर काढण्यात यश आल्यानंतर त्याची प्रकृती अत्यंत नाजूक बनली होती. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.