पुडुचेरी - केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथील आरोग्य मंत्र्याचे सध्या सर्व स्तरातून विशेष कौतूक केले जात आहे. याला कारणही तसेच खास आहे. रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्य मंत्र्यांनी शौचालयाची साफसफाई केली आहे. त्यांची ही कृती इतर राज्यातील राजकारणी मंडळीसाठी आदर्श निर्माण करणारी आहे.
देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अशा कोरोना संकटातही रुग्णालयामध्ये स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याचे समोर येत आहे. पुडुचेरीचे आरोग्य मंत्री मल्लाडी कृष्णा राव हे राज्यातील कोरोना रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळी रुग्णांची त्यांच्याकडे शौचालयाच्या अस्वच्छतेबाबत तक्रार केली. यावेळी त्यांनी क्लीनींग ब्रश आणि लिक्विड मागवले आणि शौचालयाची साफसफाई करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाला शौचालय स्वच्छतेबाबत सूचना केल्या.
दरम्यान, सध्या राज्य आरोग्य कर्मचाऱ्याची संख्या कमी असल्याने नवीन 458 कर्मचाऱ्याची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांचा समावेश आहे.