पुदुच्चेरी - पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल आणि मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण बेदींना उपराज्यपाल पदावरून हटवा या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या समर्थकांनी राज्यपाल निवासाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले असून आज (रविवार) आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.
विकास कामांत उपराज्यपालांचा अडथळा - मुख्यमंत्री
पुद्दुचेरीत काँग्रेस प्रणित सेक्युलर डेमॉक्रॅटिक पक्षाचे सरकार आहे. किरण बेदी निवडून आलेल्या सरकारची विकास कामे आणि कल्याणकारी योजना लागू करण्यात बाधा आणत असल्याचा आरोप मुख्यमंत्री व्ही. नारायण स्वामी यांनी केला आहे. राज निवासबाहेर मुख्यमंत्री आणि समर्थकांनी ८ जानेवारीला आंदोलन सुरू केले आहे.
अनेक पक्षांचा आंदोलनाला पाठिंबा -
मुख्यमंत्र्याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ए. व्ही. सुब्रमण्यम, अनेक मंत्री, कार्यकर्ते, सीपीआय, सीपीआय(एम) पक्षाचे नेते कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाचा सहकारी द्रमुक या आंदोलनापासून दूर राहिला आहे. पंतप्रधान मोदी लोकशाही आणि जनतेच्या कल्याणाचा विचार करत असतील तर त्यांनी किरण बेदींना माघारी बोलवावे, असे सीपीआय पक्षाचे सचिव मुधुरासम यांनी म्हटले आहे.