नवी दिल्ली - काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. 'पक्षाची इच्छा असेल, तर नक्की निवडणूक लढवेन. मात्र, याविषयी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही,' असे त्यांनी सांगितले.
प्रियांका गांधी सध्या प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशचा दौरा करत आहेत. त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यालाही सडेतोड उत्तर दिले. 'मी कधी कुठे जाते, हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना चांगले माहिती आहे. मी निवडणूक नसताना मंदिरात जात नाही, हे योगींना कसे माहिती,' असा सवाल त्यांनी केला आहे.
योगींनी नुकतेच 'निवडणूक आली की, प्रियांका-राहुल यांना मंदिरे आठवतात,' असे वक्तव्य केले होते.
काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रियांका गांधींनी प्रयागराज ते वाराणसीपर्यंत १४० किलोमीटरची यात्रा केली आहे. यादरम्यान त्यांनी जनसंपर्क करत सामान्य जनतेशी संवाद साधला.