लखनौ - उत्तर प्रदेश पूर्व विभागाच्या प्रभारी प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्या राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. ७० वर्षात काँग्रेसने काय केले? हा प्रश्न आता जूना झालेला आहे. सरकारने सांगावे, की मागील ५ वर्षात जनतेच्या कल्याणाची कोणते कामे केली? असा प्रश्न पत्रकारांशी बोलताना प्रियांका यांनी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यूपीच्या दौऱ्यावर आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रियांका गांधी मतदारांचे मन पडताळण्यासाठी उत्तर प्रदेश येथे गंगा यात्रा करत आहेत. आज त्यांच्या गंगा यात्रेचा दुसरा दिवस आहे. आज त्या मिर्जापूर जिल्ह्यातील विंध्याचल येथे आहेत. आपल्या यात्रेच्या दरम्यान त्या आज एका दर्ग्यावर चादरही चढवणार आहेत.
सोमवारी प्रियांका गांधी यांनी प्रयागराज येथून बोटीने गंगा यात्रेची शुरूवात केली होती. त्यानंतर आज विंध्यवासिनी देवीचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशीच्या यात्रेला सुरवात केली आहे. देवीचे दर्शन घेतल्यानंतर मौलाना इस्माईल चिश्ती यांच्या दर्ग्यावर जाणार आहेत. तर, यावेळी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही भेट घेणार आहेत.
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारला आज २ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या काळात सुरू केलेल्या योजनांचा पाढा वाचला. त्यावर प्रियांका गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. रिपोर्ट कार्डमध्ये ज्या घोषणा केल्या जातात त्या तेथेच चांगल्या वाटतात. मात्र, जमिनी स्तरावर या योजना शून्य असतात. मी रोज जनतेला भेटत आहे. मात्र, त्यांची परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे, असेही प्रियांका यांनी म्हटले.