रायपूर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे वाढलेल्या महागाईमुळे छत्तीसगडमधील जनता त्रस्त झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. ईटीव्ही भारतने याचा आढावा घेण्यासाठी दुकानदार, ग्राहक आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी आणि अन्नपुरवठा मंत्री अमरजीत भगत यांच्याशी बातचित केली.
लॉकडाऊनमुळे अन्न धान्य, अत्यावश्यक वस्तू आणि नामांकित कंपन्याचे खाद्यतेल यांच्या दरात वाढ झाली आहे.सामान्यपणे सोयाबीन तेलाची एक लिटरची 80 ते 85 रुपयांना मिळणारे तेल आता 110 ते 120 रुपयांना मिळत आहे. घाऊक व्यापाऱ्यांनीही खाद्य तेलाच्या दरात वाढ झाल्याचे मान्य केले आहे. 15 लिटरचा तेलाचा डबा आता 1500 रुपयांना मिळत आहे तो पूर्वी 1450 रुपयांना मिळत होता. किरकोळ बाजारात विक्री करताना याचा दर 300 रुपयांपर्यंत वाढत आहे.
खाद्यतेल वाढलेल्या दरात मिळत असल्यामुळे जास्त दराने विक्री करावी लागत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.नामांकित कंपन्यांचे खाद्यतेल पुरेश्या प्रमामात उपलब्ध होत नाही. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहेत, लग्नसराई देखील थांबली आहे. यामुळे खाद्यतेलाची मागणी कमी झालीय पण वाहतूकीत अडथळा येत असल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात वाढलेली महागाई लक्षात घेऊन अन्नपुरवठा मंत्री अरजीत भगत यांनी वस्तूंचे दर दुकानाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत. काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लॉकडाऊनमुळे खाद्यतेलांच्या किमतीत वारंवार वाढ होत आहे यामुळे सामान्य नागरिकांचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. खाद्यतेलांच्या दरवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता असी अडचण व्यापारी सांगत आहेत. सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्यसाठी कोणते प्रयत्न करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.