नवी दिल्ली - अनिवासी भारतीयांनी सदैव भारताचा गौरव वाढवला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना ते बोलत होते. तसेच आपल्या संविधानाने आपल्याला नागरिक म्हणून अधिकार दिले आहेत. मात्र, त्याचसोबत आपण न्याय, स्वतंत्रता, समानता आणि बंधुता यांसारख्या मूलभूत लोकशाहीच्या आदर्शांना बांधील राहू, ही जबाबदारीही आपण घेतली आहे, असेही राष्ट्रपती कोविंद म्हणाले.
राष्ट्रपती पुढे म्हणाले, केंद्र सरकाने जनकल्याणाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. ज्यात स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना या योजनांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, नागरिकांनी सुद्धा स्वेच्छेने या योजनांना लोकप्रिय जनआंदोलनाचे स्वरूप दिले आहे. स्वच्छ भारत अभियान खूप कमी कालावधीमध्ये यशस्वी झाले आहे. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 8 कोटी जनतेला लाभ झाला आहे आणि ही अभिमानाची बाब आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले. याचप्रमाणे प्रधानमंत्री किसान सम्मान निधीच्या माध्यमातून 14 कोटी लोकांना प्रतिमहिना 6 हजार रुपये रकमेचे लाभार्थी झाले आहेत.
राष्ट्रपती पुढे म्हणाले, लोकशाहीमध्ये सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष दोघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. दोघांनीही सोबत येऊन देशाच्या संपूर्ण विकास तसेच जनतेच्या कल्याणासाठी पुढे येऊन काम करायले हवे. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीबद्दल बोलताना ते म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला विशेषत: तरुणांनी गांधीजींचा अहिंसेचा मंत्र कायम लक्षात ठेवला पाहिजे. राष्ट्रनिर्माणासाठी आजही गांधीजींचे विचार प्रासंगिक आहेत. त्यांनी दिलेल्या सत्य आणि अहिंसेची शिकवण आजच्या काळात अधिक आवश्यक होऊन गेली असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - अर्थसंकल्प २०२० : व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून गोंधळ
स्वच्छ भारत अभियानाप्रमाणे जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेले जल जीवन मिशनसुद्धा एक प्रकारे जनआंदोलनाचे स्वरूप घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने सुरु केलेल्या एक देश एक कर जीएसटी प्रणालीची त्यांनी स्तुती केली.
राष्टपतींनी आपल्या संबोधनात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा उल्लेख करत या योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकारची देशातील जनतेच्या प्रती संवेदनशीलता व्यक्त होत असल्याचे ते म्हणाले. आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेमुळे देशातील आरोग्यसेवेत सुधारणा झाली आहे. जन-औषधी योजनेच्या माध्यमातून जनतेला परवडतील अशा दरांमध्ये औषधे उपलब्ध होत असल्यामुळे सामान्य परिवारातील जनतेला मदत होत असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - निर्भया प्रकरण: दया याचिका फेटाळल्यामुळे मुकेश सिंहची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव
भारतात कायम ज्ञानाला शक्ती, प्रसिद्धी आणि धनापेक्षा अधिक अमूल्य मानले गेले आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशातील एकही मुलगा, तरुण शिक्षणापासून वंचित राहू नये, असे आमचे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संबोधनात भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोची देखील प्रशंसा केली. ते म्हणाले, इस्त्रोची टीम आपल्या 'मिशन गगनयान'मध्ये पुढे जात आहे. यावर सर्व देशवासियांना अभिमान आहे. यावर्षी होणाऱ्या टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. देशातील सर्व सेनादलातील जवानांची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. जवानांच्या अद्वितीय साहस, अनुशासनाच्या अमर गाथा या देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षा कायम ठेवण्यासाठीचे जिवंत उदाहरण आहे.
तसेच या शतकातील युवा पिढी देशातील वेगवेगळ्या विषयांवर स्वतःची मते मांडताना दिसत आहे. या तरुणांमध्ये मला एका नव्या भारताची झलक दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.