नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाल्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीतील हिंसाचाराविषयी वक्तव्य केले. दिल्लीतील हिंसाचाराविषयी ऐकले, पण आमची त्यावर चर्चा झाली नाही, असे ट्रम्प म्हणाले.
लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आम्ही चर्चा केली होती. पंतप्रधान मोदींचे म्हणणे आहे की, लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळायला हवे. यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. दिल्लीतील हिंसाचाराविषयी मी ऐकले, मात्र त्यावर आमची चर्चा झाली नाही. कारण, हा भारताचा अंतर्गत विषय आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात अधिक धार्मिक स्वातंत्र्य असून धार्मिक स्वातंत्र्याविषयी भारत सध्या चांगले काम करत आहे, असे ट्रम्प दिल्लीतील हिंसाचाराविषयी म्हणाले.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार LIVE : मृतांची संख्या 10 तर दीडशेहून अधिक जखमी, उत्तर-पूर्व भागात हिंसाचार सुरूच..
दरम्यान, दिल्लीमध्ये हिंसाचारामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आतापर्यंत १० जणांचा बळी गेला आहे. १३० नागरिक आणि ५६ पोलीस यात जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पोलिसांचाही समावेश आहे. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने पुढील महिनाभर १४४ कलम लागू केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपराज्यपाल आणि अमित शाह यांचीदेखील बैठक झाली.