लखनऊ - उत्तर प्रदेशातील मॉलमध्ये आता उंची मद्य मिळणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शॉपिंग मॉलमध्ये मद्य विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून 25 ऑगस्टपासून हा निर्णय लागू असणार आहे. मात्र, मॉलच्या आतमध्ये मद्य पिण्यास परवानगी नसेल, असे स्पष्ट केले आहे. फक्त परदेशी, उंची मद्य आणि महागड्या ब्रँड्सचे मद्य विकण्यास परवानगी असणार आहे.
मागील काही वर्षांपासून मॉलमधून विविध वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परदेशी उंची मद्य मॉलमध्ये विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ग्राहकांना परदेशातूून आयात केलेली दारू, भारतात तयार करण्यात आलेली स्कॉच, ब्रँन्डी, जीन आणि वाईनचे सर्व ब्रँड शॉपिंग मॉलमध्ये मिळतील, असे उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त सचिव बी. संजय यांनी सांगितले.
वोडका आणि रम ज्यांची किंमत 700 रुपयांपेक्षा जास्त आहे. 160 रुपयांपेक्षा जास्त किमतीची बिअर मॉलमध्ये विकण्यास परवानगी असेल, असे बी. संजय यांनी सांगितले. मॉलमध्ये विक्री करण्यासाठी आधी परवाना घ्यावा लागणार आहे. या परवान्याची किंमत वर्षाला 12 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. परवाना मिळण्याची प्रक्रिया 27 जुलैपासून सुरू होणार आहे.