जालौन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महानगरात काम करणाऱ्या अनेक मजूरांच्या हातचे काम बंद झाले आहे. त्यामुळे सगळी साधने बंद असतानाही मोठ्या संख्येने मजूरवर्ग आपल्या गावाकडची वाट धरत आहेत.
उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पती-पत्नीने घरी पोहोचण्यासाठी तब्बल २०० किमीचा पायी प्रवास केला आहे. विशेष म्हणजे पत्नी ८ महिन्यांची गरोदर असतानादेखील तिने हे अंतर सतत २ दिवस पायदळी तुडवत रविवारी आपले गाव औंठा गाठले आहे.
उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील औंठा येथील अंजूदेवी (वय २५) आणि तिचा पती अशोक (वय २८) हा गेल्या ५ वर्षांपासून नोएडा येथील एका बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारीवर काम करतात. मात्र, सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या घरी जाण्याचे ठरवले. त्या दोघांनी २०० किमीपर्यंत चालत ओराई गाठले आणि तेथून एका लोडरद्वारे रथ या ठिकाणी पोहोचले. दरम्यान, ते सतत त्यांच्या परिवाराच्या संपर्कात होते.
हे पती-पत्नी दोघेही रविवारी रात्री आपल्या गावी सुखरूप पोहोचले. त्यानंतर, सामुदायिक आरोग्य केंद्रात जाऊन त्यांनी वौद्यकीय तपासणी करता गेले. डॉक्टरांनी थर्मल स्क्रीनिंग करून या जोडप्यास सामान्य असल्याचे घोषित केले. तसेच, त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचे निर्देश दिले आहेत.
आता, अंजू आणि पती अशोक दोघेही निश्चींत आहेत. आपल्या प्रवासाबद्दल सांगताना अशोक म्हणला, ''ठेकेदाराकडे आमच्या कामाचे पैसे थकीत होते. त्यामुळे आम्हाला वेळीच निघता आले नाही. मात्र, आम्ही काही पोळ्या आणि भाजी बांधून पायी निघालो. नंतर काही लोकांनी आम्हाला वाटेत खायला दिले. शेवटी आम्ही घरी परतलो, याचा मला दिलासा आहे''.