तिरुवअनंतपुरम - गर्भवती हत्तीण मृत्यूप्रकरणी दोषींबाबत वनविभागाला धागेदोरे मिळाले आहेत. पल्लकड जिल्ह्यातील तिरुविझामुकुन्नु येथून अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती मिळाली आहे. जंगली रानडुकरांना मारण्यासाठी कोणीतरी अननसात फटाके ठेवल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली आहे.
सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क येथे फटाक्यांनी भरलेले अननस खायचा प्रयत्न केला असता स्फोट होऊन हत्तीण गंभीर जखमी झाली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषींना पकडण्यासाठी पोलिसांनी आणि वनविभागाने संयुक्त तपास सुरू केला आहे. तपास पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली आहे. मात्र, सबळ पुरावा मिळाल्याशिवाय कारवाई न करण्याचे वनविभागाने ठरवले आहे.
पोलिसांनी स्थानिक नागरिकांचे जबाब नोंदविले असून, तपास सुरु केला आहे. देशपातळीवर या प्रकरणाची चर्चा झाल्याने पोलीस आणि वनविभाग वेगाने या प्रकरणी तपास करत आहे. फटाक्यांनी भरलेला अननस खाताना शक्तीशाली स्फोट झाल्याने हत्तीणीचा जबड्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच जीभही तुटली होती. काही खाता पिता येत नसल्याने जखमी अवस्थेत घटनेनंतर तिसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. नदीपात्रात जाऊन थांबली असता तेथेच तिचा मृत्यू झाला होता.