नवी दिल्ली - चीनच्या जाणीवपूर्वक आणि पूर्वनियोजित कृतीमुळे लडाखमधील गलवान व्हॅली परिसरात हिंसाचार झाल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताच्या हालचाली नियंत्रण रेषेच्या आतमध्येच होत्या. मात्र, चीनने एकट्यानेच सीमेवरील 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
गलवान व्हॅली परिसरात झालेल्या झटापटीनंतर एकही भारतीय सैनिक बैपत्ता झाला नाही. सीमा व्यवस्थापनात भारत जबाबदारपणे वागत असून भारताच्या सर्वकाही कृती सीमेच्या आतच आहेत. चीननेही त्यांच्या भूमीतच हालचाली कराव्यात. दोन्ही देशांचे दुतावास कार्यालये, परराष्ट्र मंत्रालये आणि सीमेवरील अधिकारी संपर्कात आहेत, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
सीमेवर शांतता आणि सौदार्हपूर्ण वातावरण ठेवण्यास भारत तयार आहे. दोन्ही देशांतील विवाद चर्चेने सोडविण्यासही आम्ही तयार आहोत. मात्र, पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे, भारत आपली भौगोलिक एकात्मता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी कटीबद्ध असल्याचे श्रीवास्तव म्हणाले.
23 जूनला रशिया- भारत -चीन या तीन देशांदम्यान परराष्ट्र मंत्री स्तरावरील बैठकीत भारत सहभाग घेणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. 1967 नंतर पहिल्यांदा दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. यामध्ये भारताचे 20 जवान शहिद झाले आहेत. चीनचेही जवान मारले गेले आहेत, मात्र, त्यांनी माहिती उघड केली नाही.