नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या अत्यवस्थ आहेत. मंगळवारी सकाळी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली नाही. या परिस्थितीत प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक भावनिक संदेश ट्विटरवर पोस्ट केला आहे.
'गेल्या वर्षी 8 ऑगस्ट हा दिवस माझ्यासाठी खूप आनंदी होता. कारण त्या दिवशी माझ्या वडिलांना देशाचा सर्वोच्च असणारा भारत रत्न पुरस्कार मिळाला होता आणि बरोबर एक वर्षानंतर 10 ऑगस्टला माझे वडील गंभीररीत्या आजारी पडले आहेत. देवाने त्यांच्यासाठी जे काही चांगले असेल ते करावे आणि मला एकाच वेळी सुखदुःख हे दोन्ही स्वीकारण्याची क्षमता द्यावी. तसेच मी सर्वांचे या क्षणी आभार व्यक्त करते' अशा आशयाचे भावनिक ट्विट त्यांनी पोस्ट केले आहे.
मुखर्जी यांची तब्येत अचानक ढासळली होती. त्यानंतर त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. आर्मी रिसर्च अँड रेफर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ निर्माण झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची तब्येत सध्या गंभीर असल्याचे सुत्रांनी सांगितले. तत्पूर्वी प्रणव मुखर्जी यांची कोरोना टेस्ट ही पॉझिटिव्ह आली होती. प्रणव मुखर्जी यांना दहा तारखेला दुपारी बारा वाजताच्या सुमारास रुग्णालयात भरती करण्यात आले होते.