नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' (NEET), आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा 'जेईई' (JEE) पुढे ढकलण्यासंबधी पत्र लिहले आहे. यासंदर्भात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी टि्वट करून माहिती दिली आहे.
कोरोना परिस्थिती नियंत्रणामध्ये आल्यास, दिवाळीनंतर परीक्षा घेण्यात याव्यात, असे त्यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. तसेच डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्याशीही याबाबत चर्चा केली आहे.
कोरोनामुळे सध्या देशातील पायाभूत सुविधा परीक्षा घेण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत. उदाहरणार्थ, मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतूक सुविधा सध्या उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना परीक्षास्थळी पोहचण्यासाठी 20 ते 30 किमी अंतरावरून यायचे आहे. कृपया परीक्षा पुढे ढकलाव्या, अन्यथा देशात मोठ्या संख्येने आत्महत्या होऊ शकतात, असे डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० दरम्यान होणार असून, नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. कोरोनासारखी महामारी पुढील काळातही सुरू राहील. मात्र यासाठी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालता येणार नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी संदर्भात विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती.