व्हॅटिकन सिटी - कोरोनामुळे सध्या जगभरात जणू जमावबंदी लागू झाली आहे. या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत. त्यामुळेच, आज ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना रिकाम्या चर्चमध्येच इस्टर संडे साजरा करावा लागला. सेंट पीटर्स बेसिलिका चर्चमध्ये त्यांनी इस्टर साजरा केला, त्यानंतरचा आपला संदेश त्यांनी ऑनलाईन ब्रॉडकास्टिंगद्वारे लोकांपर्यंत पोहोचवला.
या संदेशाला पोप यांनी 'आशेचा संदेश' म्हटले. यामध्ये त्यांनी कोरोनामुळे लोक करत असलेल्या संघर्षाची तुलना येशूला क्रूसावर चढताना पाहणाऱ्या लोकांशी केली. त्या लोकांना ज्या दुःखातून जावे लागले, तशाच प्रकारच्या दुःखातून आज कोरोनामुळे लोक जात आहेत, असे ते म्हटले.
दरम्यान, व्हॅटिकन सिटीमध्ये कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. तर, जगभरामध्ये तब्बल 17 लाख 80 हजार 315 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे 1 लाख 8 हजार 828 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 4 लाख 4 हजार 31 जण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत.
हेही वाचा : COVID-19 : अमेरिकेत कोरोनाचे जगातील सर्वाधिक बळी, इटलीला टाकले मागे