लखनौ - काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात (सपा) प्रवेश केला आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादवांच्या पत्नी डिम्पल यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाची प्राथमिक सदस्यता स्वीकारली. त्या लखनौ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यापूर्वी ६ एप्रिलला शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला राम-राम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
'शॉटगन' म्हणून देशभरात ओळखले जाणाऱ्या शत्रुघ्न सिन्हांनी ६ एप्रिलला भाजपला राम-राम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयानंतर आता त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा राजकारणात उतरल्या आहेत. मात्र, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश न करता समाजवदी पक्ष निवडलेला दिसतो.
समाजवादी पक्ष पूनम सिन्हांना लखनौ लोकसभा मदतार संघातून उमेवारी जाहीर करू शकते. तर, शत्रुघ्न सिन्हा पाटणा साहिब येथून निवडणूक लढवणार आहेत. लखनौ लोकसभा मतदार संघातून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह निवडणूक लढवणार आहेत. पूनम सिन्हा यांच्या रिंगणात आल्यामुळे आता येथे काट्याची टक्कर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या लोकसभा मतदार संघात ६ मे ला मतदान होणार आहे. राजनाथ सिंहानी मंगळवारीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बसपने आघाडी केली आहे. त्यामुळे लखनौ येथे भाजपला जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद लावावी लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर, समाजवादी पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेसला लखनौ येथून उमेदवारी न देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांना हरवणे सोपे होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. पूनम सिन्हा १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.