नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमधील हवेचा स्तर पुन्हा एकदा खालावला आहे. दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता अतिशय वाईट असून आज सकाळी दिल्लीच्या हवा गुणवत्तेचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) 443 नोंद झाला आहे. हा अत्यंत धोकादायक असून यामुळे नागरिकांच्या डोळ्यात आग होणे, डोकेदुखी आणि इतर समस्या सुरू झाल्या आहेत.
शनिवारी सकाळी 10 वाजता दिल्लीत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 443 होता, तर दिल्लीच्या पुसा विभागातील निर्देशांक 432 नोंदविण्यात आला. तसेच लोधी रोडवर 362, दिल्ली विद्यापीठात 480, तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 422 नोंदविण्यात आला. वायू प्रदूषणामुळे ज्या लोकांना श्वसनासंबंधित समस्या आहेत. त्यांनी घरातून बाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विना वॉल्व्हचे एन-९५ मास्क वापरावे -
प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली प्रशासन पाऊले उचलत आहे. दिल्ली सरकारने फटाक्यांवर बंदी लागू केली आहे. हिवाळ्यामध्ये २.५ ते १० पीपीएमपर्यंत प्रदूषण वाढते. अशा परिस्थितीत विना-वॉल्व्हचे एन-९५ मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्लीकरांना दिला आहे. हिवाळ्यात दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.