महाराष्ट्रासह देशाला काल (२३ नोव्हेंबर) भूकंपाचा धक्का बसला. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत, सर्वच राजकीय अंदाजांना कलाटणी दिली. अनाकलनीय अशा प्रकारचा हा शपथविधी होता. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असताना, फडणवीस यांनी अचानकपणे शपथविधी उरकून सर्वांनाच कोड्यात पाडले. याबाबत देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या.
या घटनेवर जेवढी टीका करावी तेवढी कमीच.. - गहलोत
राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांनी याबाबत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. रात्रीच्या अंधारात भाजपने जो हा खेळ खेळला आहे, त्यावर जेवढी टीका करावी तेवढी कमीच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. देशाच्या इतिहासात या घटनेची नोंद केली जाईल असेही ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदींना अशी काय चिंता भेडसावत होती, की रात्रीच्या अंधारात एवढा मोठा निर्णय घेण्यात आला, असा प्रश्न गहलोत यांनी विचारला. तर, निष्पक्षपणे काम न करता, भाजपच्या षडयंत्रात सहभागी झाल्याचा आरोपही त्यांनी राज्यपाल कोश्यारींवर केला. या घटनेनंतर भाजपची 'उलटी गिनती' सुरू झाली आहे. राष्ट्रपतींनी लवकरात लवकर याबाबत हस्तक्षेप केला पाहिजे. भाजपने आता ३ दिवसांच्या आत आपले बहुमत सिद्ध करायला हवे, असेही गहलोत म्हणाले.
जयपूरच्या भाजप कार्यालयात वाटले पेढे..
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदात, जयपूरमधील भाजपच्या कार्यालयात जल्लोष झाला. कार्यकर्त्यांसह भाजप नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवत हा आनंद साजरा केला. यावेळी बोलताना, भाजप नेते कालीचरण सर्राफ यांनी शिवसेनेवर टीका करत म्हटले, की 'आधी छोड़ पूरी को धावे और पूरी मिले न आधी पावे' या मारवाडी म्हणीप्रमाणे शिवसेनेची गत झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी शिवसेनेने जनादेशाचा अनादर केला, त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आल्याचेही कालीचरण म्हणाले.
तर दुसरीकडे, भाजप नेते आणि माजी आमदार ज्ञानदेव आहूजा यांनी शिवसेना आणि काँग्रेसचे काही आमदार, हे महाराष्ट्रातील भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले. या सर्वांना मिळून महाराष्ट्रातील सरकार मजबूत होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्रातील जनतेलाही भाजपचेच सरकार हवे होते..
लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त करत फडणवीसांचे अभिनंदन केले. फडणवीस यांनी याआधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न ते लवकरच सोडवतील. महाराष्ट्रातील ७० टक्के जागा भाजपने जिंकल्या होत्या, त्यामुळे महाराष्ट्रात भाजपची सत्ता यावी असेच जनतेचे मत होते, असेही महाजन म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, की महाराष्ट्रातील जनतेला भाजप आणि शिवसेनेचे सरकार हवे होते, मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्री नको होता. आता राष्ट्रवादी नेते भाजपसह आले आहेत, तर त्यांचे कर्तव्य आहे की पाच वर्षे मिळून सरकार चालवावे. राष्ट्रवादी नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या की जोपर्यंत कोणावरचे आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांना आरोपी म्हणणे चुकीचे आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रच्या सत्तापेचाचा निर्णय लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी