धर्मपुरी - दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याविषयी अनेक प्रकारे जनजागृती केली जाते. मात्र, नागरिकांना या सर्व गोष्टींचा धाक राहिलेला नाही. यासाठी तामिळनाडूमधील धर्मपुरी या शहरातील वाहतूक विभागाने नागरिकांमध्ये हेल्मेट घालण्याविषयी जागरुकता निर्माण करण्याची वेगळ्याच प्रकारे जबाबदारी घेतली आहे. शहरामध्ये दुचाकी चालवताना हेल्मेट न घातलेल्या लोकांची चक्क न्यायालयामध्ये सहल काढली आहे. या ठिकाणी त्यांना कायद्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेल्मेट न घातलेल्या लोकांना एकत्र करून त्यांना शहरातील न्यायालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांना हेल्मेट न घालता वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कोणता गुन्हा दाखल केला जातो आणि ते त्यांना किती महागात पडेल, याची माहिती दिली. वाहतूक विभागाच्या या कार्यक्रमाचे बऱ्याच लोकांनी कौतुक केले आहे.
एकविसाव्या शतकात वाहन चालवणाऱ्यांच्या पद्धती बदलल्या आहेत. प्रत्येकाला घरी पोहोचण्याची घाई असते. मात्र, या घाईत अनेकांना प्राणाला मुकावे लागते. तर कधी कधी लहान- मोठ्या अपघातांना सामोर जावे लागते. वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी धर्मपुरी वाहतूक विभागाकडून जागरुकता कार्यक्रम राबवला जात आहे.