मुंबई - देशाच्या सीमेवर युद्धजन्य स्तिथीचे वातावरण असताना पक्षाचा प्रचार कार्यक्रम घेतल्याने पंतप्रधान मोदी यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे . मात्र, पंतप्रधान मोदी यांनी एकाच वेळी देशभरातल्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याचा मंत्र दिला असून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचा सल्ला दिला आहे .
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातही आज सकाळपासून " मेरा बूथ सबसे मजबूत " या पंतप्रधानांच्या संवाद कार्यक्रमाची कार्यकर्ते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत होते. आगामी निवडणूक ही देशासाठी महत्वाची असून एक मजबूत सरकार सत्तेवर येण्याची गरज असल्याने बूथ कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना यावेळी मोदी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याची गरज असून पंतप्रधानांच्या सूचना कार्यकर्त्यांसाठी मोलाच्या असल्याचे पक्षाचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी झारखंड , केरळ, हरियाणा या राज्यांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. झारखंडमधील कार्यकर्त्याने मोदी यांना सोशल मीडिया संदर्भात प्रश्न विचारला होता, यावर मोदी म्हणाले की 'सोशल मीडिया डेमोक्रॅटिक मीडिया आहे. गेल्या काही वर्षात समाजमाध्यमाने देशात जागरूकता आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमाने सरकारने लोकांना मदत केली आहे. या निवडणुकीतही समाज माध्यमांचा प्रभाव जाणवेल. कार्यकर्त्यांनी सरकारच्या लाभार्थींचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून जनतेला सरकारची उपलब्धी सांगावी. कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करावा'. मात्र, अतिशय सकारात्मक आणि इमानदारीने हे माध्यम वापरा, असेही मोदी यांनी सांगितले.फेकन्यूज पासून कार्यकर्त्यांनी दूर राहिले पाहिजे. विरोधीपक्ष काँग्रेस हे खोटी माहिती देण्यासाठी माध्यमांचा वापर करत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी खोट्या माहितीला बळी पडू नये, यात त्यांनी अचूकता शोधावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला .
पक्षातला बूथ कार्यकर्ता हा सर्वात महत्वाचा घटक आहे. या घटकाने मतदारांच्या अधिक संपर्कात राहिले पाहिजे. भाजप कार्यकर्त्यांनी जनतेच्या सूचना घ्याव्यात, देशभरात आपल्या संपर्क यात्रा सुरू आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीचा जाहिरनामा याच सूचनांमधून आपल्याला करायचा आहे. " मेरा परिवार भाजप परिवार" या मोहिमेअंतर्गत घरांवर झेंडा लावा.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
नमो अॅपच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात राहा -
घरा-घरात जाऊन लोकांना भाजप परिवाराशी जोडा. २ मार्च या दिवशी विजय संकल्प बाईक रॅली आहे. यात युवा कार्यकर्त्यांनी हिरीरीने भाग घ्यावा. बूथ कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना जोडावे, सर्व कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली पाहिजे की, कोण किती जास्त लोकांना जोडणार आहे, असे आवाहन मोदींनी कार्यकर्त्यांना केले.
माझा सर्व बूथ कार्यकर्त्यांना आग्रह आहे की, त्यांनी प्रत्येकी दहा कुटुंबांशी निवडणूक पार पडेपर्यंत संपर्कात राहा. नमो अॅपच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात राहा. ३० वर्षानंतर देशात बहुमतातले सरकार आले आहे. काही लोकांना मजबूत सरकार हवे आहे. त्या लोकांना समजून सांगावे की मजबूत सरकार देशाला किती आवश्यक आहे. ते पटवून सांगा, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी बूथ कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.एकूणच पंतप्रधान मोदी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून त्यांनी थेट कार्यकर्त्यांशीच संवाद साधण्याला महत्व दिले असल्याचे स्पष्ट होत आहे.
मोदी यांच्या या प्रचार कार्यक्रमावर विरोधकांनी टीका केली आहे. मात्र, या टीकेला उत्तर देताना भाजप प्रवक्ते भातखळकर यांनी सांगितले की, 'देशात कुठेही तणावाचे वातावरण नाही. केवळ सीमेवर काहीसा तणाव आहे. विरोधकांची टीका चुकीची असून प्रत्येकाला आपल्या पक्षाचे काम करण्याचा अधिकार आहे', असे ते म्हणाले.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)