नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले वडील शरद पवार यांना आपला केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिली होती. यातून पंतप्रधान मोदींची उदारता दिसून येते. मात्र, असे होऊ शकले नाही. मीडियाशी बोलताना सुळे यांनी ही माहिती दिली.
'मी त्या चर्चेमध्ये नव्हते. मात्र, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानते. त्यांनी जे काही म्हटले, त्याने मी भारावून गेले आहे. मात्र, माझे वडील शरद पवार यांनी हे शक्य नसल्याचे अत्यंत विनम्रतेने पंतप्रधानांना सांगितले,' असे सुळे म्हणाल्या. त्यांनी संसदेच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधला.
मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत पवार यांनी मोदी सरकारकडून आपल्याला राष्ट्रपतीपदाची ऑफर मिळाल्याचे नाकारले होते. मात्र, सुप्रिया सुळे यांना मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असे ते म्हणाले होते. पवार यांच्या वक्तव्यानंतर सुळे यांनीही मीडियाशी बोलताना याचाच पुनरुच्चार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी बोलणी सुरू असतानाच शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली होती. महाराष्ट्रातील नव्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या भूमिकेविषयी विचारले असता 'ते राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माझे मोठे बंधू आहेत. त्यांचे स्थान पक्षात नेहमीचे माझे वरिष्ठ सहकारी असेच राहील,' असे सुप्रिया यांनी सांगितले.
अजित पवार यांनी मागील महिन्यात पक्षाचे निर्देश बाजूला ठेवत भाजपसह हातमिळवणी केली होती. यानंतर त्यांनी २३ नोव्हेंबरला राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, पक्षातून पुन्हा त्यांचे मन वळविण्यात आल्यानंतर त्यांनी राजीनामा देत घरवापसी केली होती.